विचारधारा २

माणसाला सवयी लागतात…कितीतरी वेगवेगळ्या.. आणि एकदा लागलेल्या सवयी, पटकन सुटत नाहीत. त्यांना आपण सोडवले आहे, असे म्हणतो खरं. हो, जेव्हा प्रचंड कष्टाने आपण लागलेल्या सवयी विसरायचा प्रयत्न करतो. पण, त्या सुटतात का हो.. मला तरी वाटतं त्या सुटत नाही. मग काय होते.. जी सवय आपण सोडवू पाहतो आहोत, ती तर काय सुटायचे नाव घेत नसते. किती आठवायचं नाही ठरवलं तरी आपल्या सवयीची आठवण आपल्याला, हमखास येतेच. जसे की मला, येतेय. प्रश्नार्थक विरामचिन्हाची. किती ठिकाणी त्याची मला गरज होती. पण, तो काय सापडत नाहीये. म्हणजे, जो किबोर्ड आता मी टायपाला वापरत आहे त्यात तो द्यायचा म्हटले, तर सिस्टीमची भाषा बदलावी लागतेय. मग, तो देऊन परत आपला मातृभाषा किबोर्ड वापरायचा, कोणी सांगितलं ना, त्यापेक्षा द्या दोन टिंब, अन चालू द्या. सवयींचे पण असेच काहीसे असते. बघा.

सवयीचे पण असेच असते, सुटली तर सुटली. सुटते म्हणजे पण काय, तर आपल्याला ज्याची सवय आहे ते आपण विसरतो. इतकंच. म्हणूनच मग बर्याचदा जी गोष्ट सोडायची आहे तिला विसरायचं. मग तिला विसरायचं तर, दुसरं काहीतरी त्याजागी हवंच. मग, ते हवं म्हणून नव्या गोष्टींचा अवलंब करायचा. याचा अर्थ काय तर एक सवय सोडायला आपण दुसरीला जवळ केलेले असते. त्यामुळे ती पहिली हळूहळू स्मृतींतून बाद होत जाते. लांब कुठेतरी कोपर्यात मेंदु तिला ठेवून देतो. अडगळीत मग पहिली सवय तशीच पडून राहते. कदाचित कित्येक कित्येक वर्षे. या कित्येक कित्येक वर्षात अनेक गोष्टी घडून जातात. आपली पहिली तर गेलेली असतेच, पण तिच्यापुढे दोन,चार , दहा इतकेही क्रमांकांनी बाजी मारलेली असते. मग, आपण मोठ्या मोठाइकी मारत सांगतो की माझी ही सवय सुटली ती सुटली, पण हे मान्य नाही करत की त्याऐवजी अमुक-तमुक नवीन सवय मला लागली आहे, ते. हे आपण मान्य केले पाहिजे ना

एका सवयीतून दुसरी सवय लागते. त्या लागलेल्या सगळ्या सवयी मेंदुच्या कुपीत बंद होऊन जातात. मग, याच सवयी अधूनमधून आपलं डोकं वर काढतातच आयुष्यात. काढणारच, निसर्गनियमच तो. निसर्ग हाच सगळ्यात मोठी नियती आहे. खरंतर, आपण काय, कसं, केव्हा, कुठे वागतोय याचा बारकाईने विचार केला तर, आपल्या जडल्या सवयी, त्यांनी नव्याने दिसलेले परिणाम, हे जर आपल्या विचारचक्रांत घोघांवू लागले तर, लक्षात येते की हे सगळं किती नैसर्गिकरित्या घडून आलं. पण अमुक एक गोष्ट घडायची होती, म्हणून आपल्याला ही सवय लागली. तेव्हा आपण निसर्गाकडे अचंबित होऊन पाहण्यावाचून काहीच करू शकत नाही. हो, ना..
काय, काय पण ते आपले भ्रम तयार झालेले असतात. मी असा झालो. हे झाले, ते झाले वगैरे वगैरे. मग, पुढे हे असं ना आपणच आपल्याला काहीतरी मोठं समजू लागतो. त्याचीही सवय अंगवळणी पाडून घेतो. आता ती सवय चूक की बरोबर हे पुढे कळून येतेच की.

असंच असतं सवयींचं. लागली म्हणजे काय तर, एखादीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करू लागतो. सुटली म्हणजे काय तर त्या गोष्टीची जागा दुसरी कोणतीतरी गोष्ट घेते. मग हे चक्र वाढतच जाते. गोल-गोल फिरतच राहते. पण, आधी कधीतरी करत असलेली गोष्ट भूतकाळातून पुन्हा उकरून बाहेर निघतेच. पुन्हा समोर येते. यालाच निसर्गनियम म्हणतात. या गोष्टींचे नियमन निसर्ग नियती करत असते. आपल्या हाताने सगळं, घडत असते. पण, आपल्या हातात यातले काही नसते. विश्वास आपल्यालाच आपला बसत नाही की हे सगळं, कसे आणि का घडत आहे. पण, हे जगाच्या चक्रानुसार घडत असते. ऋतूचक्राच्या नियमानुसारही आपल्या सवयी आपोआप बदल घडवून आणतात, आपल्याला त्याबद्दल कुठे काही समज येते. आगम्य,गूढ आयुष्याच्या अनेक गोष्टी या अशा होतात. कळूनच येत नाही कशा ते.
आयुष्यात जे घडतं, त्यामागे नक्कीच काहीतरी योजना दडलेली असते. हे खरंच. तद्शिवाय आपल्याला सवयी अंगवळणी पडणे शक्य नाही. पहिलीच नाही, तर दुसरीही नव्हेच. सवयी या आपल्याला आपण लावून घेतो त्या खूप कमी असतात. पण आपल्या कळत-नकळत लागणार्या सवयीच प्रचंड. म्हणजे, आपलं आयुष्यावर आपलं नियंत्रण नाही. त्यावर सगळं काही नियंत्रण कुणाचं, तर निसर्गाचे. बदलतो आपण, कारण निसर्ग होतो. आपण मात्र गुर्मीत, माझी ही सवय चांगली, अन ती वाईट. निसर्ग कोणती एकच गोष्ट नाही, निसर्ग चराचरांतच आहे. त्यामुळे तो जसा वाकवेल, वागवेल, तसे आपण वागू लागलो आहोत. तशा सवयींचे सुटणे आहे, जडणे आहे.

© विशाल लोणारी, २०१९

1 Comments

Leave a comment