आपल्याला आवडणारी सगळी गाणी ही अलिकडच्या काळातील किती असतात .. फारच कमी.. पण चालू दशकातील किंवा गेल्या दशकातील म्हटलं तर.. ती मात्र पटापट सांगता येतील. स्मृतींच्या पडद्याआड अलगद कापसात गुंडाळून एखादी नाजूक गोष्ट ठेवलेली असावी, तशी त्या गीतांच्या आठवणी आपण जपलेल्या असतात. अन, म्हणूनच आपल्याला त्या विषयाला सुरूवात झाल्या झाल्या क्षणाचही विलंब न होता सांगता येतात. काल-परवा कुठे कुठे फिरून आलो हे सांगायला आपल्याला थोडा विचार करावा लागतो. पण, कुठे मुशाफिरी करायला गेलो होतो, भटकायला बाहेर पडलो होतो, हे मात्र आपण लगेच बोलायला लागतो. तिथे घालवलेल्या क्षणांचा आपल्याला किंचितही विसर पडलेला नसतो. ही आपल्या मेंदुची सगळ्यांनाच आवडणारी अत्यंत खास सवय, किमया असावी यावर कुणाचेच दुमत नसेल.
ज्याप्रमाणे आपल्याला आवडत्या गाण्यांचा ज्युकबॉक्स आपल्याला तयार करून ठेवता येतो. तशीच यंत्रणा मेंदुच्या एका भागात कार्यरत असते. स्मृतीकोषाचे काम करण्यासाठी मेंदुत बऱ्याच यंत्रणा काम करत असतात. हे खरंतर मेंदुचे शरिर, मनावर मोठे उपकारच आहेत. निसर्गाने मानवाला बहाल केलेली ही दिव्य क्षमताच म्हणता येईल. कोणत्याही उदासीन होण्याच्या वेळी आपण या आठवणींना पुन्हा आपल्या विचार प्रक्रियेत आणून काही काळासाठी का होईना पण आनंदी होऊन जातो. यातून एक हर्षाची भावना आपल्या सर्वांगाला स्पर्शुन जाते. त्यामुळे थोडासा धक्काधुक्कीतून दिलासा मिळतो. अन, पुन्हा एकदा नव्याने कार्यमग्न होण्यासाठी उर्जा लाभते. प्रफुल्लित करणारी प्रसन्नता मिळाल्याचा नक्कीच चांगले कर्म करण्यासाठी उपयोग होतो.
केव्हा केव्हा असे होते की पटापट आयुष्य बदलत जाते. अनेक गोष्टी वळणे घेऊ लागतात. सध्या जिथे आहोत तिथून दूर कुठेतरी लांब निघून जातो. कळत नाही ते ही, इतक्या वेगात सगळंच चित्र पालटलेलं असते. आपल्या राहण्याचे असेल, कामाचे असेल, आयुष्यातून निघून गेलेल्या, विसरलेल्या माणसांचे पुन्हा आयुष्यात येण्याचे असेल अनेक प्रकारे आपले आयुष्य बदलते. अन, ह्या क्षणी पण आपला आठवणींचा ज्युकबॉक्सचा खेळ मेंदूच्या विचार पटावर सुरू होतो. बरं. यावेळी एखादं चार-पाच मिनिटाचे गाणे नसते. चांगला चार-पाच तासांचा सिनेमा असू शकतो. एखादा रेल्वेच्या दरवाजात उभा राहून वा बसून केलेला प्रवास असू शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत जाण्याची केलेली अनाठायी धडपड असू शकते, कुण्या भलत्या-सलत्यासाठी आपल्या जवळच्या लोकांची ओढावून घेतलेली नाराजीही यातच आली. अर्थात, चांगलेही सिनेमे असतातच की, ज्यांना चांगले अनुभव असे आपण म्हणतो. सुखद आठवणी, सिनेमे पापणी झपकायच्या आतच संपतात म्हणा, पण. दुखाची सल मात्र अनेक वर्षे सलत जाते. प्रत्येक व्यक्तीकडे अशा प्रकारचे ज्युकबॉक्स असतात. कालांतराने जेव्हा आपण त्यांना आठवतो तेव्हा कमी-अधिक प्रमाणात आपल्याला सुख, दुःख दोन्ही वाटते. कधी सध्याच्या परिस्थितीवर हायसे वाटते, कधी विषण्णता वाटते. पण, यावेळा रूक्ष आयुष्याला पुन्हा हिरव्या तांडव्याने बहरून टाकणाऱ्या असतात. मनाला मोकळं करणाऱ्या ठरतात. क्षणभर थबकवून नंतर मात्र आपली चाल झपझप करून टाकणारी असतात. हा ज्युकबॉक्सचा कोपरा अचानक हळवा करून टाकणारा असतो.
मोकळी वेळ कधी आपल्याला येवून मिळेल हे सांगता येणे कठीण. पण, कधीतरी असे होतेच. सामान्य माणसांचे आयुष्य पळापळीचे आयुष्य जगताना असा कधीसा मोकळा वेळ आपल्याला सहज सापडून जातो. अन तेव्हा आपण आवडीचे सिनेमे पाहण्यास प्राधान्य देतो. ही आपली खूप आवडीची वेळ बनून जाते. हवीहवीशी वाटून जाते. सिनेमात आपल्याला भावणारे कलाकार-पात्र असतात, ती प्रसंग आपल्या जवळची असतात. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती अन घटनांचा यात समावेश होतो. तेव्हा ते अगदी रममाण होऊन जाणाऱ्या घटनांनी नटलेलं स्वप्न संपू नयेच असे वाटते. बऱ्याच वेळ रेंगाळून जाण्याइतपत आपल्या आयुष्यात त्या आठवणींना महत्व असते. हे इतकं की आपण ठरवून आपल्याला हवा तितका वेळ घेत, रिवाइंड, करून हा सिनेमा पाहत जातो. हे सगळं विलक्षणच सुंदर..
हे सगळं आपल्याला का .. हे माणसांना कधी शाप, वरदान वाटणारे आठवणींचे गाठोडे आयुष्याच्या पाठीवर का. याचे उत्तर त्या निसर्गालाच माहिती आहेत. पण, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला हव्याशा,नकोशा आहेत त्यांना स्मृतीत राखण्याचे वा टाळता न येण्याचेच आयुष्य आपल्याला लाभलंय. त्यातून आपण थोडं जगायचं, शिकायचं. याचे कारण म्हणजे ईतिहास, भूतकाळ नेहमीच वर्तमानाला धडे देत असतो. ज्यांना गिरवून भविष्यातील सुवर्णक्षणांना मिळवता यावे यासाठी माणसांना जगण्याचे नियम ठरवता येतात. अन, यासाठीच हा ज्युकबॉक्स पुन्हा पुन्हा आपण आयुष्यात प्ले करायला हवा असतो. ही सोय म्हणजे आपलं आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची मस्त गंम्मत आहे. तोच जन्म आपण पुन्हा जगण्याची गंम्मत, ही असते या ज्युकबॉक्सची.
© विशाल लोणारी, २०१९











