प्रत्येक वेळेस व्यक्ती तितक्या प्रकृती असणे गरजेचे आहे का ? काहीतरी जगात एकसमान असायला नको का.. चार दोन सारख्या स्वभावाची माणसे एकसाथ कुठे आढळून येतच नाहीत. दर दिवशी एकाच व्यक्तीच्या स्वभावाचे अनेक विविध पैलू समोर यायला लागतात. त्यावरून त्या व्यक्तीशी आपल्या वागण्यात बदल करावा लागतो. अनेकदा तो आपोआप होत जातो. पण, हे भयंकर त्रासदायक ठरते. याचे कारण आपला मेंदू. त्याला एखादी गोष्ट जशी समोर आली तो तशी स्वीकारतो. मात्र, तीच गोष्ट,घटना, व्यक्ती काही दिवसातच वेगळ्या ढंगात आणि रंगात दिसायला लागल्यावर, मेंदूचा पुरता गोंधळ उडतो. अर्थात, मेंदुचे कार्यच आहे, सतत अद्ययावत होणे, बदल स्वीकारणे, त्यावर अंमल करणे, यातून त्याला ऊर्जा मिळते. त्यातही ही मेंदुच्या एका भागाला मिळते, भावनीकदृष्ट्या जो भाग मेंदुचा कार्यरत असतो, त्याला मात्र हे आव्हानच ठरते. याचे कारण एखाद्याशी जोडले गेलेल्या भावनांना पुन्हा नव्याने तोडणे, बदलणे हे कठीणच. अन, म्हणूनच हा प्रश्न विचारणे रास्त वाटते, की प्रत्येक वेळी असे असणेच गरजेचे आहे का.. तशी या विषयावर चर्चा होणे ही गोष्ट पण बाष्कळ वाटू शकते, पण चर्चेला विषय अगदीच चांगला आहे. ब्लॉगच्या दृष्टीने तर मला तरी योग्य वाटतो.
किती विचित्र बरं, या लोकांचे वागणे. काल ज्याच्याशी हसून-खेळून होतात, आज त्याला कुणी हिंग लावून पण विचारणार नाही. अशाने समोरची व्यक्ती कुढून जाण्याची शक्यता तयार होत नाही का .. समोरच्या व्यक्तीला या कुटील दुनियादारीला सांभाळता आले नाही तर कुठल्याशा क्षुल्लक निमित्ताने एखादी व्यक्ती वैयक्तीक नुकसान करून घेणार नाही हे कशावरून.. हे त्रास करून घेणे थांबायला हवे, तेवढी ताकद तर लोकांनी कमवायलाच हवी. जगावर आपल्याला नियंत्रण करता येणार नाही. यासाठी म्हणून आपलाच भावनिक निपटारा होवू न देणे अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या मन, मेंदू, भावना, स्वभाव पर्यायाने आपले आरोग्य या सगळ्यांशी निगडीत गोष्ट असल्याने हे जमायलाच हवे.
तसं बघायला गेले तर या जगात इतक्या समस्या आहे की त्यापुढे मी वाढलेली प्रश्नांची कढीला उगाच ऊत देत असल्यासारखे वाटेल. पण हे गरजेचे आहे हे मात्र खरं. स्वभावाला औषध नाही असे सारखं ऐकवले जात असते, खरंही आहे ते. स्वभावाला औषध नाही. अहो, पण कोणाच्या.. तर इतरांच्या स्वभावाला औषध नाही. आपण आपल्याला बदलू शकतोच की.. ह थोंड कठीण जाते. पण, जगण्यासाठी करावेच लागते. अन, बदलावेच लागते. त्यात फार काही अवघड नाही. त्याच्याने सुरूवातीला थोडासा त्रास निश्चितच होतो, पण जेव्हा हे जमतंय, बदलणं, मिसळणे, परत मिसळून बाहेर पडणं, अलिप्त राहणं, हे जमतेय असे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा तसंही जगण्याची मजा येऊ लागते. अन आनंद होऊ लागतो. थोडंसं आपल्या चांगल्या स्वभावाच्या दृष्टीने विचार केल्यास कौर्याचे ठरेल, पण ते आवश्यकच आहे. ईतरांनी आपल्याशी कौर्याने वागताना विचार नव्हता केला, मग आपण आपले चांगले करायला कशाला लाजायचे वा घाबरायचे.या वागण्याने आपला आनंद होतोय ना, तितकंच बस्स.. पुष्कळ आहे जगण्यासाठी.
असे वागणे सुरू केल्याने, घडीघडी आपला इगो दुखावला जाण्याचे चान्सेस कमी होऊ लागतात. याचे कारण कुणी चांगले वागावे याची अपेक्षा करणेच आपण सोडून दिलेले असते. त्यामुळे अपेक्षाभंग होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळे आनंद टिकून राहतो. आनंद टिकून राहणे फार महत्वाचे आहे. जगात सगळ्यांच्यासोबत चालताना त्याचीच नितांत आपल्याला गरज आहे. त्यावर शरिरातील रक्ताभिसरण अवलंबून आहे. चांगला श्वास हे काम करतो. चांगला श्वास म्हणजे आनंदी श्वास, म्हणून आनंद आयुष्यात अगदी महत्वाचा.
आयुष्य कमीत कमी गोष्टींचा भरणा केलेलं हवं. पण त्यात संधी खूप असाव्यात. काय ना, असे असले की जीवनात ताणतणाव कमी असतो. उणे-पुरे काही फार नको असते. खूप नाती जोडायची असतात, खूप वेळही जगण्याला हवा असतो. अन म्हणूनच हा एक छानसा बदल आपण केला पाहिजे. की कोणताही बदल आपल्याला पटकन करता आला पाहिजेच. अर्थपूर्ण असे नाती आणि माणसांची सुंदर गुंफण आपल्याभोवती विणता यायला हवी अन, म्हणूनच हा स्वभावाचा डाएट करता यायला हवा. नाकारणार्याला नाकारा, स्वीकारणार्याला स्वीकारा. ठोकरणार्याला ठोकरून द्या, हात देणार्याला ऊचलून घ्या. राबवून घेणार्याकडून राबण्याचे मोल वसूल करा. जसे जग वागते तसा बदल घडवून आणा तरच जगण्याची गम्मत आहे, मजा आहे. जगणे तेव्हा सजा होणार नाही. खरी श्रीमंती आयुष्याची भोगता येइल.
आता, अजून किती वाचायचं आहे, उठा आणि कामाला सुरूवात तर करा …
© विशाल लोणारी, २०१९
अधिक लेख वाचा येथे







